पुणे - शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावरच पीकविमा कंपन्यांची कार्यालये बंद करण्याचे सुचत आहे. गेल्या ५ वर्षापासून या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, मात्र शिवसेनेला हे आत्ताच दिसले का? असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असा टोलाही मुंडेंनी ठाकरेंना लगावला आहे.
गेल्या ५ वर्षांपासून पीकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. तेव्हापासून या कंपन्या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? असे म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी दिला होता इशारा
शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पीक विमा कंपन्यांना दिला होता. विमा कंपन्यांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून पैसे जमा केले आहेत. परंतु, नुकसान भरपाई देण्याची वेळ आली की, त्या हात आखडता घेतात. शेतकऱ्यांना नडणाऱ्या या विमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. शेतकऱ्यांना नाडाल तर ती बंद करू, असा आक्रमक पवित्रा ठाकरे यांनी घेतला.