मुंबई - सत्ताधाऱ्यांची वर्तणूक म्हणजे विधिमंडळाच्या प्रथेला लागलेला कलंक असल्याचे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला. आज १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता. त्याला बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब करायला भाग पाडल्याचे मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या या भ्रष्ट सरकारचा निषेध असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्दा आज सभागृहात मांडला जाणार होता. मात्र, या मुद्दयाला बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याचे मुंडे म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी सभागृहात आज गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब करावे लागले.
सत्ताधाऱ्यांकडून सभागृहाचा अपमान
विधिमंडळाच्या इतिहासात आज पाहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला गेला. धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला. यातूनच सरकारची नियत कळते. सरकाचे हे अशोभनीय वर्तन सभागृहाचा अपमान करत असल्याचे मुंडे म्हणाले.