मुंबई - राज्यातील विदर्भ, कोकण आदी भागातील धानउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावापेक्षा 700 रुपये अधिक बोनस रुपाने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहेत. याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
बोनस रुपाने दिली जाणार मदत-
राज्यात धानउत्पादक शेतकऱ्यांना 1 हजार 868 रुपये हा हमीभाव दिला जात होता. आमच्या सरकारने मागील वर्षी यात वाढ केली. त्यात अधिकची मदत दिली. शेतकऱ्यांच्या या हमीभावावर त्यांना अधिकची मदत जाहीर केली होती. राज्यात सध्या धानाला 2 हजार 568 हमीभाव आहे इतका हमीभाव आणि शेतकऱ्यांना बोनस रुपाने 700 रुपये इतकी दिली जाणारी ही मदत देशातील कोणत्याही राज्यात नाही. त्यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी सरकार तब्बल साडेबाराशे कोटी रुपये इतका भार सहन करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
अफवांना बळी पडू नये-
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे दिसत असली तरी, लोकांनी घाबरू नये. राज्यात तूर्तास तरी कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन केले जाणार नाही. राज्य सध्या कोरोनाच्या बाबतीत नियंत्रणात आहे. मात्र, पुढील काही दिवसांत सर्व परिस्थिती पाहूनच सरकार निर्णय घेईल. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होईल म्हणून काही जण अफवा पसरवत असून त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी यावेळी केले.