मुंबई - चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीचा उत्सव मुंबईसह वडाळा येथे आज पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची मंदिरे तसेच हनुमान मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच भजन, कीर्तन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो आबालवृद्ध भाविक त्यात सहभागी होताना दिसत आहेत.
वडाळा, येथील प्रसिद्ध राम मंदिरांसह मुंबईतील विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला गेला. सूर्योदय झाल्यानंतर रामजन्माचा सोहळा सुरू झाला. रामाला पाळण्यात घालून पाळणे गायले गेले. त्यानंतर पालखी मिरवणुकाही काढल्या गेल्या. वडाळा येथील राम मंदिरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. पहाटे रामनवमी निमित्ताने मुंबईतून अनेक ठिकाणाहून भाविक राम देवाच्या दर्शनासाठी वडाळा राममंदिर येथे येतात.