मुंबई - मुंबई विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक प्राध्यापक योगेश सोमण प्रकरण चांगलेच गाजत आहे. काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या सोमण यांच्यावर काँग्रेस प्रणित एनएसयुआय या संघटनेने कारवाई करावी म्हणून चार दिवसांपूर्वी जोरदार आंदोलन छेडले होते. यानंतर विद्यापीठाने याची दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणात आता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह इतर हिंदुत्ववादी संघटना सोमण यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आल्या असतानाच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय हा तमाम देशभक्तांना प्रचंड वेदना देणारा असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - योगेश सोमण यांच्यावरील कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी - सचिन सावंत
महाराष्ट्रात वीर सावरकर यांच्या विचारांवर निष्ठा असणारे मुख्यमंत्री असताना किमान असा प्रकार होणे अपेक्षित नाही. हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावा आणि तसे निर्देश विद्यापीठाला द्यावे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.