मुंबई : केंद्रीय वन, पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काही महत्त्वाच्या विषयांबाबत मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील व राज्यातील सचिव व महत्त्वाचे नेते हजर होते. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील व राज्यातील योजना समन्वय साधून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जाईल, याबाबत माहिती दिली. तसेच जयंत पाटील यांच्यावर ईडी कडून झालेल्या कारवाई बाबतही त्यांनी भाष्य केलं.
'जयंत पाटलांना घाबरण्याचे काही कारण नाही' : जयंत पाटील यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'केंद्रातील किंवा राज्यातील तपास यंत्रणा आपल्या परीने काम करत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे असतील किंवा काही माहिती असेल तर त्या आधारे ते आपलं काम करतात. परंतु जयंत पाटलांनी तसं काही केलं नसेल तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही.'
एमआयडीसीमध्ये 7 हॉस्पिटल बांधण्यासाठी तयार : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काही महत्त्वाच्या विषयाबाबत मुंबईत बैठक घेतली. याबैठकी बाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात एमआयडीसीमध्ये 7 हॉस्पिटल बांधण्यासाठी तयार आहेत. त्यातून हजार पेक्षा जास्त बेड्स तयार होतील. त्यासाठी त्यांची काही जागांची मागणी आहे. त्यापैकी 3 ठिकाणच्या जागा आम्ही देऊ शकलो आहे. इतर 4 ठिकाणच्या जागांबाबत एका महिन्यात निर्णय घेऊ. त्याच बरोबर मुंबई, मुलुंड येथे जागा उपलब्ध आहे. तिथे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल उभारायचे आहे. त्याबाबतही निर्णय झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.
असंघटित कामगारांसाठी विशेष प्रयत्न : ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त असंघटित कामगारांना संघटित करून त्याची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असल्याचे फडणवीस म्हणाले. यासंदर्भात सर्व डेटा महाराष्ट्र सरकारशी करार करून ते राज्याला देत आहेत. तसेच केंद्रातील व राज्यातील योजना त्यांच्यापर्यंत समन्वय साधून कशा पद्धतीने पोहचवता येतील, या बाबतही चर्चा झाली.
हेही वाचा :