मुंबई - विधानसभेत सीएएचा प्रस्ताव आणायची आवश्यकता होती. सत्ताधारी पक्षातील अनेकांनी वल्गना केल्या की, आम्ही हा कायदा आणू देणार नाही. त्यासाठी नेमकी राज्य सरकारची भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी हा प्रस्ताव आम्ही सभागृहात ठेवला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. कॅगच्या अहवालावर सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यायचे आहे. कारण सर्व टेंडर त्यांच्या काळातली असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत, त्यावर सरकारची नेमकी भूमिका काय? हे जाणून घ्यायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
सरकारमधील घटक पक्षात ताळमेळ नाही - दरेकर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) राज्य सरकारची भूमिका काय? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. सीएए बाबत राज्य सरकारची भूमिका जनतेला समजायला हवी असेही दरेकर म्हणाले. सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणताच ताळमेळ नाही. त्यामुळे सरकारचे सीएएबाबत कोणती भूमिका आहे, हे सर्वांना समजायला हवे असेही दरेकर म्हणाले.