मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार होता. मात्र, आज अचानकपणे तो रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाबद्दल अनेकांना आक्षेप होता सर्वांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हा कार्यक्रम अखेर रद्द झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी लपून-छपून आणि घाईघाईने करण्याचे कारण काय?, असा सवाल उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळाली. पंधरा वर्ष दुसरे सरकार होते त्यांनी एक इंच ही जागा मिळवली नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम देखील सुरू केले. मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन देखील झाले.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे सर्व आंबेडकरी नेते आणि चळवळीतले लोक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. गेल्या दीड वर्षात चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम झालेले आहे. मात्र, आज त्या ठिकाणी हे राज्य सरकार कोणते पायाभरणीचे काम करत होते याची मला कल्पना नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. काही मंत्र्यांनी खासगीमध्ये त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती नसल्याचे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
पायाभरणीचे काम हे सरकार करत असेल तर, ते लपून-छपून न करता उघडपणे करायला हवे .कोणालाही माहित नसताना अचानक कार्यक्रम निश्चित करणे. मंत्र्यांना देखील न सांगता लपून छपून पायाभरणी करण्याचे कारण काय ? आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात कार्यक्रम राजरोसपणे करा असे लपून-छपून न करता सर्वांना बोलावून करा हे राष्ट्रीय स्मारक आहे. आज अशा प्रकारचा कार्यक्रम करणे चांगला नाही योग्य नाही यामुळे सरकारचे हसू होते, असे फडणवीस म्हणाले.