मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री ठाकरेंनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे आज (मंगळवारी) मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर ट्विट करत टीका केली. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडून असा प्रतिसाद मिळाला आहे. पोलीस आणि माध्यमांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. प्रश्न विचारला की माध्यमांवर हल्ले करण्यात येत आहे. अशाने पूजा चव्हाणला न्याय मिळणार का?' असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
काय घडला प्रकार?
पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहेत. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हजारो लोक संजय राठोड यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या सगळ्या प्रकरणाबाबत विरोधकांनी संजय राठोड आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
हेही वाचा - राज्यात तरुण मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार; आकडेवारी चिंताजनक
मुख्यमंत्री ठाकरेंकडून दखल -
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशिमचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेत आढावा घेतला.