मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत. आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही. या घटनेची राज सरकारने गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केले आहे, असेही पवारांनी सांगितले.
पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध केला.
नेमकी काय आहे घटना? -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ची मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. घरांच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात, इतके महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारच्या घटनेनंतर देशभर निषेध व्यक्त होत आहे.