मुंबई - 'तुमच्या हातातील सत्ता गेली आहे, आता तुमच्यातील आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत, आमच्याकडे ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही तुम्ही सांभाळा तसेच तुमच्याकडेच ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही याची काळजी घ्या', असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे. ते विधानसभेत बोलत होते.
मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. सरकार जाण्याची भीती कॉंग्रेसमध्ये आहे. यावरून आता महाराष्ट्रात देखील राजकीय समीकरण बदलेल असे बोलले जात आहे. यावरूनच भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी गुरूवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा चिमटा काढला होता. एखादा ज्योतिरादित्य सिंधिया महाराष्ट्रातही येईल आणि सरकार कोसळेल अशा शब्दात सुधीर मुंनगंटीवार यांनी सरकारला डिवचले होते. यावर आज (शुक्रवारी) अजित पवार यांनी पलटवार केला.
मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मुनगंटीवार म्हणतात आमची चूक झाली. मात्र, आता माफी नाही. आमच्याकडे ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तुमच्याकडे ज्योतिरादित्य निघेल, तुम्हीच तपासा, अशा शब्दात पवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच मी काही लपून करत नाही, तिथे गेलो सोडून आलो. आता इथे मजबूत बसलो, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रादेशिक असमतोलाची टीका फडणवीस यांनी केली होती. यावर मंत्री पवार म्हणाले, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, अशी टीका तुम्ही केली.यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करत आहोत. यंदाचं वर्ष संयुक्त महाराष्ट्राचे हिरक वर्ष आहे. हिरक महोत्सव असताना कुठल्याही भागावर दुजाभाव घडणार नाही, पाप घडणार नाही असा आमचा प्रयत्न असतो. जिथे कुणाला कमी वाटत असेल तिथे वाढवून देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, दुजाभाव आणि भेदभावाचा आरोप आम्हाला मान्य नाही. या अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्रही अर्थसंकल्पात आहे. एवढेच नाही तर सीमा भागातील कारवार निपानी या भागालाही निधी दिला. उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी पहायला मिळतील. राज्यातील सर्व जिल्ह्यातील आणि आमची विनंती आहे, 'उघडा डोळे, बघा नीट' असेही ते म्हणाले. तसेच ज्यांना चुका वाटतात त्यांना विनंती आहे, विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुुख पिक कापूस, त्या कापूस खरेदीसाठी शासनाने १८०० कोटीची हमी दिली. तसेच हमी देऊन २८०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दिले आहेत. गुरूवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा केली, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास, सुधीर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे -
- मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील मंत्री कापसाच्या प्रश्नावर बसणार आहोत, तशा सूचना मुुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
- राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासू देऊ इच्छितो, सरकार तुमचे आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही, सरकार तुमच्या पाठीशी आहे
- हे काय पश्चिम महाराष्ट्रातीील शेतकरी आहेत, हे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातीील शेतकरी आहेत, आणि तुम्ही खुशाल आरोप करता
- फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग आहे
- तक्रारी आल्या तर शहानिशा करण्याचा अधिकार नव्या सरकारचा आहे.
- या समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने ८५०० कोटी रुपये भागभांडवल उभे केले
- कुठून जातो समृद्धी महामार्ग, तो जातो माझा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागातून साकोली विदर्भातील तिथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा विचार
- मालेगाव इथे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला, महाराष्ट्र उभा करताना आम्ही सर्व विभागांचा विचार केला आहे.
- तुमच्या काळात अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्यांनी चांदा काढला आणि बांदा काढला आणि आपल्या भागात विकास करायचे ठरवले,
- अर्थमंत्री होते चंद्रपूरचे, राज्यमंत्री होते बांदाचे, या दोघा पठ्ठ्यांनी आपली शहरे निवडली आणि त्याचाच विकास केला, मी आकडेवारी देतो... मात्र, मला खोलात जायचे नाही
- बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पाला 690 कोटी दिले, तीन पट निधी वाढवला चार केंद्र
- विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, अमरावतीसह तीन नवी शासकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला
- अमरावतीतील अचलपूरचा विकास करण्याचा निर्णय घेतला
- अमरावती विभागीय आयुक्तालय इतर विभागीय आयुक्तांच्या तोडीचे करण्याचा निर्णय घेतला
- विदर्भ, मराठवाड्यात रेशमची लागवड करण्यासाठी निधी देण्याची तरतुद केली आहे
- पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला, त्याचा फायदा विदर्भाला होणार आहे
- अमरावती, अकोला इथे विमानतळ विकसित केले जाणार आहे
हेही वाचा - काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार
कोरोनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदारांना काळजी घेण्याचा सल्ला -
आमदारांनी काळजी घ्या... इराणमध्ये तीन खासदार मृत्यूमुखी पडले आहेत... जनतेत आपण असतो... जनतेला टाळता येत नाही... मात्र, थोडसे अंतर ठेवायचा प्रयत्न करा... आपली काळजी घ्या... मतदारसंघातील जनतेची काळजी घ्या...
आमदारांना वाहन घेण्यासाठी 30 लाखापर्यंत कर्ज मिळणार -
- मुद्दल आमदारांनी द्यायची... पाच वर्ष व्याज सरकार भरणार
- या बजेटवर मंदी सावट होते, शेअर मार्केट घसरला, पैसे गेले, सातवा वेतन आयोगाचा बोजा होता
- डोंगरी विकास निधी वाढवला, जिथे 1 कोटी देत होतो त्यांना वाढवून 2 कोटी - जिथे 50 लाख होते त्यांना 1 कोटी देणार
- शेतकरी कर्जमाफी योजनेत सर्वात जास्त फायदा विदर्भ, मराठवाडा भागाचा झाला आहे
- आतापर्यंत 17 लाख 80 हजार शेतकऱ्यांना 11 हजार 340 कोटी रुपये कर्ज खात्यात जमा झाली
- मागच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना सुरू केली... 89 लाख शेतकऱ्यांना 34 कोटीची देशातीील सगळ्यात मोठी कर्जमाफी, ऐतिहासिक कर्जमाफी असे उत्तर फडणवीस यांनी दिले होते... मात्र, आज 34 महिने झाले, किती लोकांना याचा फायदा... तीन-तीन वर्ष कर्जमाफी चालते का हो?
- आम्ही १५ दिवसात 11 हजार 340 कोटी रुपये दिले... 15 एप्रिलपर्यंत या योजनेत पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे धोरण आहे... यासाठी २२ हजार कोटी रुपये लागणार आहेत... मागच्या सरकारने २६ जीआर काढले... त्यात अधिकारीही गोंधळून गेले होते... आम्ही जाहीर केलेल्या शेतकरी योजनेचा एकच जीआर काढला आहे... त्यावर योजना सुरू आहे
- पूर्वीची कर्जमाफी पिवळी यादी, हिरवी यादी, लाल यादी... मात्र, काय झाले त्याचे? लोकांना सिग्नल आहे का असे वाटायचे
- नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही आम्ही ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला
- दोन लाखाच्या वरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तसेच जमीन धारणाची अट आम्ही कर्जमाफीत टाकली नाही