मुंबई - राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही. तसेच त्याची खात्री पटत नाही. तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून मागील तीन महिन्यात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना शिक्षण विभागाकडून जुलै महिन्यात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहे. यामुळे पालक चिंता व्यक्त केली जात आहे. यावर सरकारची भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारला असता, ते बोलत होते.
बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांनी नवीन बियाणे द्यावी -
राज्यात ११ लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी आठ हजार कोटी लागणार आहेत. केंद्राकडून आपला टॅक्स येणे बंद झाले आहे. त्यामुळे आठ कोटींवर लागणारे व्याज आम्ही बँकांना देऊ. तशी हमी सहकार विभागाकडून दिली आहे. पैसे देईपर्यंत आम्ही व्याज आणि मुद्दल देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात काही जिल्ह्यात बोगस बियाणे देण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यावर विचारले असता पवार म्हणाले की, महाबीजचे काही बियाणे उगावले नाहीत. आमच्या कृषिमंत्र्यांनी जाऊन पाहणी केली. ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले, त्यांना तातडीने नवीन बियाणे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
...तर मोठी किंमत मोजावी लागेल -
टेस्टिंग आम्ही वाढवाल्याने बाधित लोकांची संख्या वाढवली आहे. आता लोकांना परवडेल, असे नवीन टेस्टिंग आले असून मास्कसोबत सगळ्या गोष्टी आटोक्यात आणल्या जाईल. जे औषध ४० हजारांची होती, ती आता कमी केली जात आहे. लोक कसे वाचतील? यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच कोरोनाच्या काळात जुलै आणि ऑगस्ट महिना अधिक त्रासदायक ठरू शकतो. नागरिकांनी कोरोना काळात स्वतःची काळजी घेतली नाही, तर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील पवारांनी दिला. तसेच आशा वर्करला संपावर जाण्याची वेळ सरकार येऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कोकणाची भौगोलिक परिस्थती पाहता महत्त्वाची गावे कव्हर झाली आहेत. वीज सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले. तसेच राज्यात होत असलेल्या बदल्यांबाबत आम्ही कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत, असे सांगितले होते; अधिकाऱ्यांच्या नाही, असेही पवार म्हणाले. तसेच चीनकडून भ्याड हल्ला करण्यात आला. मात्र, जे राष्ट्र आपल्या विरोधात वागतेय त्यांच्या वस्तू वापरणे बंद केले, तर चीन एका दिवसात जागेवर येईल, असे ठाम मत पवारांनी व्यक्त केले.
दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी यावेळी राज्यातील कलावंतांना लवकर मिळाली नाही तर लोक उपाशीपोटी मरतील. मदत करता येईल तेवढी मदत त्यांना करावी. त्यांच्या जगण्या मारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी हजारो वर्ष लोककला जिवंत ठेवली आहे. त्यांचा विचार व्हावा, अशी मागणी केली. ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांनी यावेळी कोरोनामुळे नाट्य क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. त्यामुळे 1500 नाट्यकर्मी राष्ट्रवादीची प्रत्येकी 2500 रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली. तसेच मराठी नाट्य कर्मींसाठी 10 कोटींचा संकल्प असून त्यासाठी सरकारने मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, हेमंत टकले, आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.