मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटला आहे. या प्रश्नावर नुकती दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही पार पडली आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute) आज महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. तर, कर्नाटकडे बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान, बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीककरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु, या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेलं व्यासपीठही पोलिसांनी हटवले आहे. तसेच, कर्नाटक सरकारकडून सीमेवर जमावबंदीचे (144)कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे, हा सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नदी परिसराला छावणीचे स्वरूप - कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून बेळगावमध्ये (Belagavi) सुरुवात झाली. याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीककरण समितीने बेळगावमध्येच मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्या मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्रातील माजी मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या उर्फ प्रताप माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी दूधगंगा नदीकडे येत होते. दरम्यान, सीमेवर कर्नाटक पोलिसांतर्फे एक जिल्हा पोलीस प्रमुख, तीन डीएसपी, पाच सीपीआय, 10 पीएसआय, आठ कर्नाटका स्टेट रिझर्व पोलीस वाहने आणि पोलीस, होमगार्ड तैनात केले. त्यामुळे संपूर्ण नदी परिसराला कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
नेतेमंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित - महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अन्य आघाडीतील नेतेमंडळी, कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचे ध्वज घेऊन दूधगंगा नदीवर हजर झाले होते. यावेळी बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट झालेच पाहिजे, मराठी बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही. पोलिसांच्या हुकूमशाहीचा व कर्नाटक प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. तसेच, कर्नाटक पोलिसांनी यावेळी काही कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनाही अटक केली. त्यामुळे वातावरण थोडावेळ तणावपूर्ण बनले होते. या घटनेनंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी कर्नाटक शासनाच्या या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी नेतेमंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सीमाभागाचा दौरा करणार - बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. असे स्पष्ट केले आहे. काल रात्री स्टेज उभारण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. ही तोंडी परवानगी होती. नंतर लेखी परवानगी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आज अचानक पोलिसांनी स्टेज बांधण्याचे काम थांबवले. हा प्रकार आमची गळचेपी असल्याची असल्याची प्रतिक्रिया महराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या दोन्ही राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. यावेळी सीमाभागातील मराठी बांधवांशी बोलून त्यांच्या मनातील भावना जाणून घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
आम्ही सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यावर आज महाराष्ट्र एकीकरण समितीने एका आंदोलनाचे अयोजन केले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन होते. परंतु, कर्नाटक सरकारने त्यासाठी परवानगी दिली नाही. आपल्या इथूनही काही नेते तिथे जाऊ इच्छित होते, त्यांनाही परवानगी दिली गेली नाही. तर आम्ही नक्कीच याबाबत कर्नाटकच्या सरकारशी चर्चा करू. कारण, दोन्ही राज्यांनी हे ठरवले आहे की येण्याजाण्यावर काही प्रतिबंध नाही आणि जर शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर त्याला रोखण्याचेही काही कारण नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, आमचे सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी उभे आहे, जी मदत लागेल ती पुरवू, अशी ठाम भूमिकाही फडणवीसांनी यावेळी मांडली आहे.