मुंबई - परळ पूर्वेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामार्गालगत असलेल्या 'हमीद मेंशन' या इमारतीचे तोडकाम सुरू आहे. यावेळी मोठी दुर्घटना होऊ शकते आणि इमारत समोरच्या रस्त्यावर कोसळू शकते याची जाणीव कंत्राटदार आणि कामगारांना झाल्यानंतर त्या संदर्भातील घेतलेल्या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी महापालिका आणि म्हाडा प्रशासनाकडून इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई शनिवारी सकाळपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामार्गावर असलेली हमीद मेंशन नावाची खासगी इमारत अत्यंत जर्जर झाली होती. त्यामुळे मागील 6 महिन्यापूर्वीच म्हाडाने तिला धोकादायक ठरवून त्या इमारतीतील सर्व रहिवाशांना खाली करण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे 4 महिन्यापूर्वी येथील रहिवासी इमारतीतून दुसरीकडे वास्तव्यास गेले होते. 2 महिन्यापासून ही इमारत तोडण्याचे काम सुरू होते. त्यात शुक्रवारी ही इमारत तोडताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्याने त्यातील एक मोठा भाग रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब कंत्राटदार व के अँड के एंटरप्राइजेसचे प्रमुख प्रशांत कांबळे व येथे काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आली. त्यानंतर तातडीने या इमारतीला रस्त्याच्या बाजूला न कलांडता ती आतील बाजूला कलंडली जाईल, यासाठी खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर होणारी मोठी दुर्घटना टळली, असे कंत्राटदार प्रशांत कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
ही इमारत अत्यंत जर्जर झाल्याने इमारत पाडण्याचे कंत्राट आपल्याला मिळाले होते. त्याअनुषंगाने आम्ही अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने इमारतीचा काही भाग रिकामा करत होतो. मात्र, पाऊस आणि इतर कारणामुळे इमारतीच्या काही भागाला मोठ्या चिरा गेल्या होत्या. त्यामुळे एक संपूर्ण भाग रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच आम्ही या इमारतीला रस्त्याच्या बाजूला न झुकता ती आतील बाजूला झुकली जाईल, यासाठी मोठा खड्डा निर्माण केला. त्यामुळे ही इमारत आतील बाजूला कलंडली. यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.