मुंबई - घडाळ्याच्या काट्यावर चालणारा मुंबईकर खाण्या-पिण्याच्या वेळेकडे आणि झोपेकडे लक्ष देत नव्हता. तिथे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करणे तर दूरच. पण आता मात्र कोरोनाच्या भीतीने अनेकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच सद्या मुंबईत व्हिटॅमिन 'सी', 'ई' च्या गोळ्या, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यासह च्यवनप्राशची मागणी वाढल्याचे औषध विक्रते सांगत आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून यावर अद्यापही औषध नाही. त्यातही रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कॊरोना होत नाही वा झाला तरी त्याला लवकर हरवता येते हे नेहमीच कानावर पडत असून सोशल मीडियावर हीच चर्चा असते. त्यामुळे हेच ऐकून गेल्या महिन्याभरापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याची माहिती घाटकोपर भटवाडी येथील औषध विक्रेते जयेश नलावडे यांनी दिली आहे.
व्हिटॅमिन 'सी' व 'ई' च्या गोळ्यांना वाढती मागणी कोरोना येण्याआधी व्हिटॅमिन सी, ई आणि बी कॉम्प्लेक्सच्या 2-3 ट्रिप्स जायच्या दिवसाला. पण आता काही तास आमचे दुकान खुले असताना त्या वेळेतच 7-8 जण ही औषध घेण्यासाठी येत आहेत. या औषधांसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, पण तरीही लोकांना ती कशी घ्यावी, किती वेळा घ्यावी हे समजून आम्ही सांगतो असेही जयेश यांनी सांगितले आहे.रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी योग्य संतुलित आहार आणि व्यायाम गरजेचा आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर कुठलाच आजार लवकर होत नाही. पण एक डॉक्टर म्हणून त्यामुळे कोरोना होत नाही असे कुठल्याही आधारावर ठामपणे सांगता येत नसल्याची प्रतिक्रिया डॉ. पंकज भांडारकर, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र यांनी दिली. तर व्हिटॅमिन सी, ई या औषधामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. पण तरीही याचे अतिरिक्त सेवन नको. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधे घ्यावीत असेही त्यांनी सांगितले. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सध्या खूप गरजेचे आहे. तेव्हा संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा, महत्वाचे म्हणजे घरातच बसा असा सल्लाही डॉ. पंकज भांडारकर यांनी दिला.