मुंबई - शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यावर्षी १२०० टन कोल्डमिक्स मिश्रण बनवून हे कोल्डमिक्स पालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये वाटप केले. मात्र, त्यानंतर पालिकेने मुंबईमधील बहुतेक खड्डे पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजने भरले आहेत. यामुळे हे कोल्डमिक्स गेले कुठे? असा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापरच केला गेला नसल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी दक्षता विभागाकडून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा व माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केली आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यात अस्फाल्ट (डांबर), कार्बनकोअर, हॉटमिक्स, कोल्डमिक्स आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मात्र त्यानंतरही अद्याप खड्डे बुजवण्यास पालिकेला अपयश आले आहे. २०१३ - २०१८ या कार्यकाळात पालिकेने २० ते ३० हजार टन हॉटमिक्स वापरून खड्डे बुजवले. मात्र, गेल्या दोन वर्षात खड्डे बुजवण्यासाठी पालिका कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान वापरत आहे.
कोल्डमिक्सचा वापर करून खड्डडे बुजवले जातात असा दावा पालिका करत आहे. यावर्षी १२०० टन कोल्डमिक्स पालिकेने तयार करून आपल्या २४ विभाग कार्यालयात वाटपदेखील केले. पालिकेच्या विभाग कार्यालयात कोल्डमिक्स पाठवण्यात आले असले तरी खड्डे मात्र पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिज टाकून बुजवले जात आहेत. २०१७ - १८ मध्ये पालिकेने ३९८१ खड्डे बुजवले आहेत. एक खड्डा बुजवण्यासाठी पालिकेने ५ टन कोल्डमिक्स वापरले आहे. त्यामुळे कोल्डमिक्सचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी दक्षता विभागाकडून करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी केली आहे.
खड्डे बुजवण्याचा भ्रष्टाचार -
गेल्या दोन वर्षात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. या पावसाळ्यात १२०० टन कोल्डमिक्स वापरले, असे पालिका सांगत आहे. मात्र, हे कोल्डमिक्स पावसात वाहून जात असल्याने खड्डे जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे कोल्डमिक्स तंत्रज्ञान पूर्ण फेल ठरले आहे. कोल्डमिक्स नसल्याने पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजने खड्डे बुजवण्यात आल्याने त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. पेव्हर ब्लॉकला तत्कालीन आयुक्तांनी बंदी घातली असताना आता पुन्हा पेव्हर ब्लॉक वापरले जात आहेत. यामुळे दुर्घटना घडल्यास त्यास पालिका जबाबदार असेल असे रवी राजा यांनी सांगितले. एक खड्डा बुजवायला १७ हजार रुपाये खर्च केला जात आहे. त्याचीही चौकशी करण्याची गरज असून मुंबईमधील खड्डे बुजवायला पुन्हा हॉटमिक्स हे तंत्रज्ञान वापरावे. असे रवी राजा म्हणाले.
खड्ड्यांची आकडेवारी -
२०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या एकूण २४ हजार १४६ ऑनलाइन तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी २३ हजार ३८८ तक्रारींची दखल घेण्यात आली. यावर्षी १० जून ते १ ऑगस्ट २०१९ पर्यंत २६४८ तक्रारींपैकी २३३४ तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. तर ४१४ खड्ड्यांच्या तक्रारींची दखल घेणे बाकी आहे. सन २०१७-२०१८ मध्ये ३९८१ खड्डे भरण्यासाठी ७ कोटी ७३ लाख २२ रुपये खर्च झाले आहेत. तर, सन २०१८-२०१९ मध्ये ४८९८ खड्डे भरण्यासाठी ७ कोटी ९८ लाख ७ रुपये खर्च झाले आहेत. त्यानुसार एक खड्डा भरण्यासाठी १७ हजार ६९३ रुपये खर्च करण्यात आले आहेत.