मुंबई - महापालिकेत विरोधी पक्षनेते पदी प्रभाकर शिंदे यांची घोषणा करण्याच्या मागणीसाठी भाजपने पालिका सभागृहात गोंधळ सुरू केला. याबाबत भाजपने प्रभाकर शिंदे यांच्या निवडीसाठीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले आहे. यावर पेडणेकर यांनी आधीच विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या रवी राजा यांची नियुक्ती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपने 'नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही, दादागिरी नही चलेगी,' अशा घोषणा देत पालिका सभागृह दाणाणून सोडले.
- काय आहे प्रकरण -
यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते आणि तटस्थ भूमिका स्वीकारली होती. त्यावेळी राज्यात भाजप-सेनेची युती होती. त्यामुळे तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसला हे पद मिळाले. त्यावेळी याबाबत न्यायिक सल्ला घेण्यात आला होता.
दरम्यान, आता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस सोडत नाही तोपर्यंत हे पद भाजपला मिळणे कठीण आहे. महानगरपालिका कायद्यानुसार गटनेता असलेला सदस्यच विरोधी पक्ष नेता म्हणून निवडला जातो. मात्र, भाजपने गटनेता आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी 2 वेगवेगळी नावं दिली आहेत.