मुंबई: ठाकरे गटात नाराज असलेल्या दिपाली सय्यद गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दिपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही तारीख पे तारीख सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. तरीही प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंध यामुळे ताणले जातील. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे बोलले जाते.
दीपाली सय्यद यांचा प्रवेश लांबला: बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी दिपाली सय्यद यांनी प्रयत्न केले. प्रयत्न असफल ठरल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी आजवर किमान चार ते पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. बुधवारी ९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षप्रवेश पुढे ढकलत रविवारी १३ नोव्हेंबरला ठेवण्यात आला. सुरुवातीला पक्षप्रवेशाचे ठिकाण वर्षा निवासस्थान ठेवण्यात आले. रात्री ऐनवेळी या ठिकाणात बदल करत ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी प्रवेश करणार असल्याचे दीपाली सय्यद यांच्याकडून सांगण्यात आले. दुपारी एक वाजताची वेळ देण्यात आली. मात्र आजचा प्रवेश ही पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी तारीख आणि वेळ मिळणार असून त्या दिवशी प्रवेश करणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले आहे.
भाजपचा विरोध: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे दिपाली सय्यद यांना भाजपने शिंदे गटातील प्रवेशाला विरोध दर्शवला होता. पंतप्रधानांची जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिंदे गटात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांकडूनही सय्यद यांच्या प्रवेशाला अंतर्गत विरोध आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची यामुळे गोची झाली असून सय्यद यांना प्रवेश द्यायचा की नाही. याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
काय म्हणाल्या होत्या दीपाली सय्यद: येत्या तीन दिवसात मी शिंदे गटात प्रवेश करणार असून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आली आहे. माझ्यावर जबाबदारी दिली जाईल ती मी स्वीकारण्यास तयार आहे. येत्या शनिवार पर्यंत मी शिंदे गटात प्रवेश करेल. तसेच मुंबई महानगरपालिकेचे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत, याची खंत रश्मी वहीनींना जाणवत असल्याची टीका सय्यद यांनी केली होती. शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, सुशमा अंधारे या चिल्लर आहेत. मुख्य सुत्रधार रश्मी वहीनी असल्याचा हल्लाबोलही त्यांनी चढवला होता. शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, समोरून सहकार्य मिळाले नाही. शिंदेनी मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची सध्या गरज असल्याने मी शिंदे गटात जात आहे, असे सय्यद यांनी म्हटले होते.