मुंबई : लालबाग परिसरातील पेरू कंपाउंड येथे एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत सापडला आहे. पोलिसांनी कुजलेला मृतदेह ताब्यात घेऊन; पोस्टमॉर्टमसाठी केईएम रुग्णालयात पाठविला असल्याचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले आहे. वीणा प्रकाश जैन असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिली माहिती : मुंबईतील लालबाग राजा सोसायटी समोर असलेल्या पेरू कंपाऊंड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला होता आणि मग तो मृतदेह कपाटात बंद करून ठेवला होता असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळाली आहे. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. हात - पाय असे शरीराचे अनेक भाग कापण्यात आले. अशा स्थितीत रात्री उशिरा एफएसएल टीमलाही पाचारण करून संपूर्ण फ्लॅटचा पंचनामा करण्यात आला.
बावीस वर्षीय पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या : काल रात्री उशिरा पोलिसांना हा प्रकार कळताच पोलिसांनी कपाटातील प्लास्टिक पिशवी काढून ती उघडली असता, त्यामध्ये 50 ते 55 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मृताच्या मुलीची चौकशी करण्यात येत आहे. मृत महिलेच्या मुलीला रात्री काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक केली आहे. पेरू कंपाउंड मधील स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली की, बावीस वर्षीय पोटच्या मुलीनेच आईची हत्या करुन; मृतदेह प्लास्टिक पिशवीत भरून कपाटात लपवला होता. मृत महिलेची मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून, तिची चौकशी सुरू आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून; या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.