मुंबई : देशभरात आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आदिवासी दिन साजरा होत आहे. आपल्या साध्या सरळ शैलीने नेहमीच चर्चेत असणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्य सरकारकडे आदिवासी दिनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करून शासकीय पद्धतीने आदिवासी दिन साजरा करावा, अशी मागणी केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी पेहराव करून ठेका देखील धरला. यावेळी दिंडोरी मतदार संघातील आदिवासी महिला-पुरुषांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये मंत्री संजय राठोड देखील सहभागी झाले होते.
योजनेला निधी कमी पडतो : आदिवासी समाजाच्या योजनेसाठी सरकारकडे जो निधी दिला जातो त्यातील आस्थापना स्वतंत्र केल्यामुळे पगारासाठी 363 कोटी रुपये खर्च होतात. बजेटमध्ये आदिवासी घटकाला 9.35% निधीची तरतूद आहे; मात्र तो मिळतो केवळ 7.35%. आदिवासी घटकाला योजना राबविण्यासाठी वर्षाला साडेसहा हजार कोटी रुपये कमी पडतात. त्यामुळे योजनेसाठी पैसा नसेल तर योजना कशासाठी, असा प्रश्न झिरवळ यांनी उपस्थित केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निधी दोन टप्प्यात द्यावा, अशी मागणी समाजाच्या वतीने नरहरी झिरवळ यांनी केली आहे.
गबाळ्या माणसाला तीनवेळा निवडून दिले : महाराष्ट्रात अनेक खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी क्रांती दिन साजरा होत आहे. आज मुंबईत विधान भवनामध्ये आदिवासी दिन साजरा केला जात आहे. यावर्षीचे हे चौथे वर्ष असून हा कार्यक्रम अशाप्रकारे पुढे चालत राहावा यासाठी मूलभूत पाया निर्माण करणे गरजेचे आहे. कार्यक्रम तर होतच राहतील; मात्र त्यात खंड पडता कामा नये याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि आदिवासी दिन शासकीय पद्धतीने साजरा करावा, अशी मागणी नरहरी झिरवळ यांनी केली आहे. आजच्या विधानभवनातील कार्यक्रमाला सर्वच आदिवासी आमदारांना उपस्थित राहायचे होते; मात्र मी त्यांना आपापल्या मतदार संघात कार्यक्रम घ्यावा. मी विधानभवनातला कार्यक्रम घेतो, असे सांगितले होते. माझ्या मतदारसंघातील जनता सुज्ञ असून माझ्यासारख्या गबाळ्या माणसाला तीनवेळा आमदार म्हणून निवडून दिले, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, असे नरहरी झिरवळ म्हणाले.
हेही वाचा: