मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर यातून मार्ग काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय येत्या शुक्रवारी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले नाना पटोले -
५० टक्क्यांच्यावर आपल्याला जाता येत नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणारच नाही, त्याही जिल्ह्यांमध्ये कसे आरक्षण मिळेल, यासंदर्भात अभ्यास सुरु आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे. जवळपास महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये आरक्षण कायम राहणार आहे. उर्वरित १६ जिल्ह्यांमध्ये कमी जास्त पणा होईल. त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये कसे आरक्षण देता येईल, यावर चर्चा झाल्याचे पटोले म्हणाले. तसेच राजकीय वाद बाजूला सारुन सर्वांनी ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वांची भूमिका एक आहे. ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी सगळ्यांचे एकमत झाले. तसेच त्यावर मार्ग कसा काढता येईल, यावर चर्चा झाली. येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आणि त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण