मुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील (Elgar Parishad case) चार आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये दोष मुक्ती करिता अर्ज दाखल केला होता. (acquittal application in Elgar Parishad case). या अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालय निर्णय देणार होते. मात्र निकाल अद्याप पूर्ण न झाल्याने आज ऑर्डर देण्यात आली नाही. या अर्जावर पुढील सुनावणी दरम्यान निकाल देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (decision on Elgar Parishad case postponed).
पुढील सुनावणी 19 डिसेंबरला : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदर्शनांनुसार मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे, महेश राऊत, ज्योती जगताप आणि सुधीर ढवळे या चौघांनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर आज निकाल येणे अपेक्षित होता. मात्र निकाल अद्याप पूर्ण झाला नसल्याने आज निकाल पुन्हा राखून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांनी एनआयएला पुढील सुनावणीदरम्यान संबंधित अधिकारी उपस्थित राहतील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहे.
15 जणांवर गुन्हा दाखल आहे : एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये कायद्याअंतर्गत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी जामीनावर बाहेर आहेत. तर सात आरोपी 2018 पासून आणि सहा जण 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध करून दिल्या जात नाही तोपर्यंत न्यायालय खटला पुढे करू शकत नाही.
नेमके प्रकरण काय ? : मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. त्यावेळी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली. या दंगलीचे पडसाद देशभर उमटले होते. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्ये दंगलीला कारणीभूत होते अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.