मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. ६ ते ९ हजाराच्या घरात रोज रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी मृत्यूदर २.०१ टक्के इतका होता तो आता २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात ८ जिह्यात बाधितांचे प्रमाण अजूनही पाच टक्क्यांवर असून तेथे चिंताजनक स्थिती कायम आहे.
रुग्ण संख्येत चढउतार
मुंबईत ९ जुलैला ८ हजार ९९२ नवीन रुग्ण आढळून आले असून २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैला ९ हजार ११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७ जुलैला ९ हजार ५५८ नवे रुग्ण आढळून आले असून १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६ जुलैला ८ हजार ४१८ नवे रुग्ण आढळून आले असून १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५ जुलैला ६ हजार ७४० नवे रुग्ण आढळून आले असून ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ जुलैला ९ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले असून १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ व ५ जुलैला मृत्यू दर २.०१ टक्के इतका होता. ६ व ८ जुलैला मृत्यू दर २.०२ टक्के इतका झाला तर ९ जुलैला मृत्यू दरात वाढ होऊन तो २.०३ टक्के इतका झाला आहे.
८ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती
आठ जिल्ह्यांत बाधितांचे प्रमाण अजूनही पाच टक्क्यांवर असून तेथे चिंताजनक स्थिती कायम आहे. राज्यात सर्वाधिक १०.२४ टक्के बाधितांचे प्रमाण कोल्हापुरात आहे. त्या खालोखाल सातारा (९.१४ टक्के), सांगली (८.८१ टक्के), रायगड (७.८८ टक्के), पुणे (७.६८ टक्के), रत्नागिरी (७.२९ टक्के), सिंधुदुर्ग (६.५५ टक्के), पालघर (५.२६ टक्के) आणि बुलढाणा (४.५७ टक्के) या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे.कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांतील संसर्ग दर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात घटला होता. परंतु २७ ते ३ जुलै या आठवड्यात मात्र पुन्हा वाढला. कोल्हापूर आणि साताऱ्यातील बाधितांचे प्रमाण या आठवड्यात अनुक्रमे तीन आणि दोन टक्क्यांनी वाढल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याची आकडेवारी
कोरोनामुळे शुक्रवारी ९ जुलैला २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १ लाख २५ हजार ३४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६.०८ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०३ टक्के एवढा आहे. दिवसभरात ८ हजार ९९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १० हजार ४५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाख ४४० रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४ कोटी ३५ लाख ६५ हजार ११९ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ४० हजार ९६८ (१४.१ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २७ हजार २४३ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ४ हजार ७५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख १२ हजार २३१ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत अपेक्षित घट नाही
राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यू याबाबतची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून एका टप्प्यावर येऊन स्थिरावली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या प्रमाणात अपेक्षित घट होत नसल्याने आरोग्य विभागापुढील डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट हे सुद्धा काळजी वाढवणारे विषय आहेत. यामुळे राज्यात कडक निर्बंध आजही लागू आहेत.
हेही वाचा - ईटीव्ही भारतचा दणका; शिक्षकांना धरणाच्या गळतीकडे लक्ष ठेवण्याचे काम केले रद्द