मुंबई : येस बँकेच्या ४८ रिटेलर्संनी ग्राहकांची सुमारे 1 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांकडून आतापर्यंत 60 लाख रुपये वसूल केली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
देवेंद्र फडणवीसांची माहिती : नवी मुंबईतील व्ही के वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीच्या माध्यमातून आधार इनबिल्ड पेमेंट सिस्टीमद्वारे संगणकीय साधनांचा वापर करून ग्राहकांना मनी ट्रान्सफर आधार कार्ड वरून पैसे काढणे तसेच मोबाईल रिचार्ज करणे व बिल पेमेंट आणि इतर सेवा देते. वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे येस बँक आणि फोन पे हे सर्विस प्रोव्हायडर असल्याचे माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात दिली आहे.
व्ही के वेंचर्स वर गुन्हा दाखल : व्ही के वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नोंदणीकृत असलेल्या 48 रिटेलर्सने संगणकीय साधनांद्वारे ग्राहकांच्या आधार कार्ड आणि बोटांच्या ठशांचा गैरवापर केला. तसेच या गैरवापराद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमधून एकूण 1 कोटी 37 लाख 48 हजार 753 रुपये परस्पर काढून घेऊन अपहार केला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
रक्कम वसूल : याप्रकरणी व्ही के वेंचर्स च्या 48 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आयटी कलमाद्वारे ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या 48 रिटेलर्स आरोपींनी संबंधित ग्राहकांच्या बँक खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली. त्या ग्राहकांनी त्यांच्या बँकांमार्फत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर व्ही के वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने संबंधित ग्राहकांच्या खात्यामध्ये सुमारे 60 लाख 547 रुपये परत केले आहेत. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.