मुंबई : गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. अजूनही लाखो गिरणी कामगारांना घरे मिळालेली नाहीत. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाबाबात विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पात्र उमेदवारांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. यासाठी छाननी समितीमार्फत छाननी प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच नवी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. तर मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जागांबाबत सविस्तर निरीक्षण करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सरकारचे लक्ष वेधले : आमदार सुनील राणे यांनी गिरणी कामगरांच्या घराच्या प्रश्नासंदर्भात शनिवारी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. या लक्षवेधीला गृहनिर्माण मंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. दरम्यान, गिरणी कामगारांनी काही जागा निश्चित केल्या आहे. त्या जागांवर काही आरक्षण किंवा गावरान जमिन आहे का? हे तपासून पाहिले जाऊन लवकरच या जागाही निश्चित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, कालिदास कोंळबकर, सदा सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केले. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासाठी आमदार सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गिरणी कामगारांचे घरांचे पुनर्वसन : गिरणी कामगारांनी घरांच्या मागणीसाठी 2005 पासून संघर्ष सुरू केला आहे. 13 फेब्रुवारीला लाखो गिरणी कामगारांचे घरांचे पुनर्वसन करण्यासाठी महामेळावा घेतला होता. राज्यातील एकूण 1 लाख 46,000 गिरणी कामगारांना महाराष्ट्र शासनाने घरे देण्याचा निर्णय घेतलेला. 18 जानेवारी 1982 मध्ये या संदर्भात महाराष्ट्रात गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप झाला होता. केंद्र शासनाच्या 15 गिरण्या अजून विकायच्या बाकी आहेत. त्याबाबत 18 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा देखील नेला होता. 2020 या काळामध्ये 13,447 घरे वाटप केले होते.