मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा शुक्रवारी लिलाव झाला. लिलावात वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या मूळ गावातील त्याची जमीन विकत घेतली. या जमिनीची किंमत काही लाखांत आहे, मात्र श्रीवास्तव यांनी तब्बल 2 कोटी 1 लाख रुपयांची बोली लावून ही जमीन खरेदी केली. यावरून आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
एवढी मोठी बोली का लावली : अजय श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार ते सनातनी हिंदू आहेत. ते त्यांच्या पंडिताच्या सांगण्यानुसार पावलं उचलतात. त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा सर्व्हे नंबर अंकगणित वापरून काढला आहे. अंकगणित शास्त्रानुसार या जमिनीचे आकडे त्यांच्या नशिबासाठी चांगला संकेत होता. म्हणून त्यांनी ही जमीन खरेदी करण्यासाठी इतकी मोठी बोली लावल्याचं वकील अजय श्रीवास्तव यांनी सांगितलं. या जमिनीवर आता सनातनाची शिकवण देणारी शाळा बांधण्यात येणार असल्याची माहिती अजय श्रीवास्तव यांनी दिली आहे.
आधीही दाऊदची मालमत्ता खरेदी केली आहे : अजय श्रीवास्तव यांनी दाऊद इब्राहीमची मालमत्ता खरेदी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये त्यांनी दाऊदचा बंगला खरेदी केला होता. तेथेही आता सनातनाची शिकवण देणारी शाळा बांधण्यात येणार असल्याचं अजय श्रीवास्तव यांनी सांगितलंय. नोंदणी केल्यानंतर लवकरच शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. 24 वर्षांपूर्वी कुलाब्यातील हॉटेल डिप्लोमॅटमध्ये झालेल्या लिलावात श्रीवास्तव यांनी दाऊदचे नागपाड्यातील दोन कमर्शियल गाळे बोली लावून जिंकले. मात्र, अद्याप ते त्यांच्या ताब्यात आलेले नाहीत.
कट्टर शिवसैनिक : अजय श्रीवास्तव पेशानं वकील असून बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते त्यांच्या कट्टर शिवसैनिकांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतात येण्यास मज्जाव केला होता. तेव्हा शिवसैनिकांनी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदान उखडून टाकलं होतं. यामध्येही अजय श्रीवास्तव यांनी मोठी भूमिका बजावली होती.
हे वाचलंत का :