मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा शकील यांचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटीला अटक करण्यात आली. या कुख्यात आरोपीने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सद्स्यत्व मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत त्याला अटक केली.
गेल्या अनेक दिवसांपासून रियाज भाटी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सद्स्यत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याने मुंबईतील प्रसिद्ध विल्सन महाविद्यालयाच्या नावावर बनावट कागदपत्रे बनवून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात जमा केली होती. त्याने आपण स्वतः इंडियन स्पोर्ट्स चालवत असल्याचे दिलेल्या कागदपत्रात नमूद केले होते. मात्र, विल्सन महाविद्यालयाकडून आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पडताळणीदरम्यान विल्सन महाविद्यालयाकडून उघड झाले. त्यानंतर त्याची तक्रार खंडणीविरोधी पथकाडे देण्यात आली. खंडणी विरोधी पथकाने आज आरोपी रियाजला अटक केली.
रियाजला यापूर्वी झाली होती अटक -
पेशाने बिल्डर असलेल्या रियाज भाटी यापूर्वीही २०१५ साली दोन पासपोर्टसह मुंबई विमानतळावर पकडला गेला होता. याबरोबरच २००७ साली खंडाळा येथे झालेल्या गोळीबारात रियाज भाटीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २००८ साली मुंबईतील मालाड परिसरात जमीन बळकावण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.