मुंबई - पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील 23 इमारती या अतिधोकादायक आहेत. या इमारतींतील भाडेकरूंना पावसाळ्यापूर्वी गोराई येथे पाठवले जाणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना गोराई येथील संक्रमण शिबिरात पाठवण्याची तयारी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाने सुरू केली आहे.
दरवर्षी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे राहण्यास योग्य नसलेल्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा नियमित पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येत असते. यावर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मागील वर्षापेक्षा धोकादायक इमारतींच्या यादीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींची संख्या 14 हजार 207 एवढी आहे. या इमारतींच्या केलेल्या सर्वेक्षणात मागील वर्षीच्या 5 आणि इतर 18 अश्या मिळून 23 इमारतींचा धोकादायक यादीत समावेश आहे. त्यात 507 निवासी, 308 अनिवासी असे एकूण 815 भाडेकरू राहत आहेत. त्यापैकी 197 भाडेकरूंनी स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. शिवाय म्हाडाने 6 रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवले असून उर्वरित 329 भाडेकरुंना गोराई येथील संक्रमण शिबिरात पाठवले जाणार आहे. तेथे म्हाडाचे 400 संक्रमण गाळे उपलब्ध आहेत. शिवाय पुढील दोन-तीन महिन्यात मंडळाकडून 1 हजार 800 गाळे बांधले जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते संक्रमण शिबिरात हलवण्याच्या नोटीसा देण्यात आल्या असल्या, तरी बरेच रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास इच्छुक नाहीत.
इमारतीचा धोकादायक भाग वापरू नये, संक्रमण शिबिरासाठी अर्ज करावे, पुनरबांधणी वा इमारतीच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.