मुंबई - मुंबईत बुधवारपासून पाऊस पडत आहे. बुधवारी आणि शनिवारी पावसाचा रेड अलर्ट असल्याने पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईत आज (रविवारी) आणि उद्या (सोमवारी) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्याने मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुपारी समुद्राला मोठी भरती -
मुंबईत काल पावसाचा रेड अलर्ट होता. शनिवार सकाळी 8 ते आज रविवार सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात शहर विभागात 28.85 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 42.24 मिलिमीटर तर पूर्व उपनगरात 68.53 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज दुपारी 2.10 वाजता समुद्राला भरती आहे. यावेळी समुद्रात 4.31 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामुळे याकालावधीत पाऊस सतत पडत राहिल्यास मुंबईत पाणी तुंबून राहू शकते. मुंबईत सध्या पाऊस नसल्याने बेस्ट बस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
हेही वाचा - नाशिक : दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्याच्या शेतात पेरणी!
धोका टळला -
मुंबईत आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. रेड अलर्टदरम्यान अतिवृष्टी होते. मात्र, मुंबईवरील हा धोका टळला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईत आता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.