मुंबई - आयुष्यभर तांदळाच्या जाती शोधण्यासाठी परिश्रम घेणारे सुप्रसिद्ध कृषी संशोधक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. राज्य सरकारने भारत सरकारकडे या पुरस्कारासाठी शिफारस करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहले आहे.
दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ वाण शोधले होते. या अत्यंत बुद्धिमान कृषी संशोधकाचे निधन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झाले. यासाठी त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे करून या कृषीरत्नाचा योग्य सन्मान करावा, असे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
कोण आहेत दादाजी खोब्रागडे?
दादासाहेब खोब्रागडे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी-नवरगाव मार्गावरील खुटाळा येथे १९३९ मध्ये झाला होता. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या एका छोट्याशा खेड्यातील अल्पशिक्षित, गरीब आणि अल्प भूधारक शेतकरी होते. त्यांनी दोन एकरांच्या छोट्याशा तुकड्यात भातशेती करत असताना एचएमटीसह तांदळाच्या वाणाच्या ९ प्रजातींचा नव्याने शोध लावला. पुढे त्यांची ओळख ही एचएमटी तांदळाच्या जातीचे जनक म्हणून झाली. त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने नोव्हेंबर २०१० च्या अंकात घेतली होती. त्यामुळे जागतिक पातळीवर दादाजी खोब्रागडेंचा एच.एम.टी. ही धानाची नवीन प्रजाती शोधल्याबद्दल सन्मान करण्यात आला होता.
५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एका सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्पती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हस्ते एच.एम.टी. ही धानाची नवीन प्रजाती विकसित केल्याबद्दल ५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन दादाजींचा सत्कार करण्यात आला होता.