मुंबई - अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या आठवड्यात ३ जूनच्या सायंकाळपर्यंत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर धडकू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
स्थानिक हवामान विभागाच्यावतीने हा किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 'दक्षिणपूर्व और पूर्व मध्य अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी, किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.
या वादळामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामाना विभागाकडून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या पूर्वी बंगालच्या उपसागरातही अम्फान चक्री वादळ निर्माण झाले होते. या वादळामुळे ओडिशा पश्चिम बंगाल या राज्यात अतोनात नुकसान झाले आहे.