मुंबई Cyber Fraud : महाराष्ट्र सायबर सेल मुंबईच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात तीन तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले (वय 45) त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संविधान कलम 465, 467, 468, 469, 471, 419 420 आणि 120 ब तसंच माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. कारण आरोपीने ओपन वाय-फायद्वारे हा सायबर क्राईमचा गुन्हा घडवून आणला होता.
'या' बनावट ईमेल वरून आला मेल : vidyadharmahale.min@gmail.com हा खोटा ईमेल आयडी तयार करून आरोपी मोहम्मद इलियाज याकूब मोमीन (वय 40) याने या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आलेल्या बनावट पत्रांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट सही होती. त्याचप्रमाणे तोतयेगिरी करून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसंच सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले. तो स्वतःची ओळख लपवून इंटरनेटचा वापर करून शासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी तसंच सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे.
काय होते प्रकरण : उपकार्यकारी अभियंता गणेश असमर यांची भांडुप शहर परिमंडळ येथून पुणे परिमंडळ येथे बदली करण्यात आली असल्याचा मेल आरोपी मोमीन याने पाठवला होता. तसंच सहाय्यक अभियंता दुर्गेश जगताप यांची रत्नागिरी परिमंडळातून कल्याण परिमंडळात बदली करण्यात आली आहे, असा मेल पाठवण्यात आला होता. तर सहाय्यक अभियंता मनीष धोटे यांची जळगाव परिमंडळातून अमरावती परिमंडळात, यशवंत गायकवाड यांची रत्नागिरी परिमंडळातून पुणे परिमंडळात त्याचप्रमाणे सहाय्यक अभियंता ज्ञानोबा राठोड यांची नाशिक परिमंडळातून पुणे परिमंडळ, सहाय्यक अभियंता योगेश आहेर यांची नाशिक परिमंडळातून औरंगाबाद परिमंडळात प्रस्तावित बदली करण्यात आली अशी माहिती देणारे पत्र आरोपीने संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सहाही अधिकाऱ्यांची सायबर विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतरच त्यांनी किती रक्कम आरोपीला दिली होती हे स्पष्ट होईल, असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाले यांची सायबर पोलिसात तक्रार : पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, शासकीय सेवेतील सहा अधिकाऱ्यांना या आरोपीने बनावट बदलीचे ऑफर लेटर ईमेलद्वारे पाठवले होते. महावितरणच्या एका अधिकाऱ्याला प्रथम हा ईमेल आयडी गेल्यानंतर महाले यांच्या लक्षात आले की हा फ्रॉड आहे. त्यानंतर या सायबर फ्रॉड संदर्भात महाले यांनी तीन तारखेला नोडल सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला 4 ऑक्टोबरला मिरज शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने सांगलीतील मिरज येथून अटक केली आहे. अटक आरोपी मोहम्मद इलियाज याकूब मोमीन हा खासगी कॉन्ट्रॅक्टरचे काम करत असून याआधी देखील त्याच्यावर मिरजमध्ये सायबर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्याला आज न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. आणखी काही आरोपींचा या गुन्ह्यात हात असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास आम्ही करत आहोत, असे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले आहे.
'या' पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मेहनत : हा संपूर्ण तपास नोडल सायबर पोलीस ठाणे महाराष्ट्र सायबर पोलीस मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुकळे, पोलीस शिपाई संजय राजपूत, अक्षय गोळे, शाम आगवणे यांनी केला आहे.
हेही वाचा:
- Cyber Fraud In Pune: युट्यूबवरुन दिले शेअर मार्केटचे धडे, लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थानहून अटक
- Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांची फसवणूक करण्याचा 'हा' नवा प्रकार ऐकून व्हाल थक्क!
- Cyber Fraud: ओटीपी न देता जर सायबर फ्रॉड झाला; तर आरबीआयला 3 दिवसात तक्रार द्या, पैसे परत येतील, अर्पित दोशी सायबर तज्ञ