मुंबई - राज्यातील मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आर्थिक गुन्हे, सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात वाढ झाल्याचं एनसीआरबीच्या 2019च्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. याबरोबरच भारतात अनधिकृत शस्त्रात्रे बाळगण्याच्या संदर्भातील गुन्हे, बनावट चलनी नोटा, परदेशी नागरिकांच्या संदर्भात घडलेले गुन्हे किंवा परदेशी नागरिकांनी भारतात केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा.
मुंबई, पुण्यात आर्थिक गुन्हे वाढले -
महाराष्ट्रातील पुणे व मुंबई शहरात आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत आढावा घ्यायचे झाले तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 2018मध्ये तब्बल 4803 आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले होते. यात 2019मध्ये वाढ होत तब्बल 5,556 गुन्हे वाढल्याचे दिसून येत आहे. तर पुणे शहरात 2,018 मध्ये 777 आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले होते. याचे प्रमाण 2019मध्ये 934 इतके नोंदवण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात घट -
भ्रष्टाचाराच्या संदर्भात 2017मध्ये महाराष्ट्रात 925 गुन्हे नोंदविण्यात आले होते. यामध्ये 2018 या वर्षात 936 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात 2019मध्ये घट झाली असून 891 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सायबर गुन्ह्यात मुंबई पुढे , दुसऱ्या क्रमांकावर पुणे -
सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात 2017 मध्ये 3604 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले होते. 2018मध्ये हेच प्रमाण 3,511 इतके होते. मात्र, 2019मध्ये यात वाढ होत तब्बल 4,967 सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 2019मध्ये सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. यात मुंबई शहरातून तब्बल 2,527 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तर त्या खालोखाल पुणे शहरातून 309 सायबर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याबरोबरच नागपुरमधून 119 सायबर गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
हेही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र
देशात आर्थिक गुन्हे व भ्रष्टाचार वाढला -
आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात राष्ट्रीय गुन्हे अहवाल ब्युरोनुसार, (नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो) भारतात 2019मध्ये तब्बल 1 लाख 65 हजार 782 आर्थिक गुन्हे घडले. यामध्ये 2018च्या तुलनेत तब्बल 6.1 टक्क्यांची वाढ झालेली असल्याचे समोर आले आहे. तर 2018मध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत 1 लाख 56 हजार 268 गुन्हे नोंदविण्यात आले होते. 2019 या वर्षभरामध्ये भारतात 4,243 गुन्हे हे भ्रष्टाचाराच्या संदर्भात नोंदवण्यात आले. याआधी 2018मध्ये 4,129 गुन्हे नोंदविण्यात आले होते. यावरुन 2018च्या तुलनेत तब्बल 2.8 टक्क्यांची वाढ भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये झालेली असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान 4, 422 आरोपींची अटक झालेली असून तब्बल 1092 आरोपी दोषी सिद्ध झाले आहेत. याबरोबरच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विभागीय चौकशी होऊन तब्बल 705 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सायबर गुन्हे 63.5 टक्क्यांनी वाढले -
2019 याच वर्षभरामध्ये भारतात तब्बल 44,546 सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली असून 2018च्या तुलनेत तब्बल 63.5 टक्क्यांची वाढ ही सायबर गुन्ह्यांमध्ये नोंदविण्यात आलेले आहे. 2018 मध्ये हेच प्रमाण 27 हजार 248 इतके होते.
परदेशी नागरिकांच्या संदर्भातील गुन्हे -
भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता भारतात 2019मध्ये तब्बल 409 परदेशी नागरिकांसोबत गुन्हे घडलेले आहेत. यामध्ये 2018च्या तुलनेत घट झाली आहे. 2018मध्ये हेच गुन्हे 517पर्यंत नोंदविण्यात आले होते. यात 2019 मध्ये 20.9 टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे. परदेशी नागरिकांच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये चोरी व फसवणूकसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतात आलेल्या परदेशी नागरिकांकडूनही गुन्हे घडले आहेत. या संदर्भात 2019मध्ये तब्बल 2,251 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2018मध्ये हेच प्रमाण 2,128 इतके होते. 2019मध्ये 2018च्या तुलनेत तब्बल 5.8 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
हेही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र
अनधिकृत शस्त्रास्त्रे व बनावट चलनी नोटांच्या संदर्भातील गुन्ह्यात वाढ -
अनधिकृतपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी 2019 वर्षी तब्बल 73,122 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यादरम्यान 79,547 शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 1,980 परवानाधारक शस्त्र आहेत. तर 70,567 परवाना नसलेले शस्त्र असल्याचे समोर आले आहेत. 2019 या वर्षामध्ये भारतात तब्बल 2 लाख 87 हजार 404 बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आली आहे. याची किंमत 25 कोटी 39 लाख 9 हजार 130 इतकी आहे. 2018मध्ये तब्बल 2 लाख 57 हजार 243 भारतीय बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांची किंमत 17 कोटी 95 लाख 36 हजार 992 इतकी होती. 2018च्या तुलनेत 2019मध्ये बनावट नोटा चलनीप्रकरणी तब्बल 11.7 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.