मुंबई - लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची लूट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. भारत-चीन वादनानंतर भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली. त्यात टिक-टॉकचाही समावेश आहे. जवळपास १२ कोटी वापरकर्ते असलेल्या टिक टॉकवर बंदी आणल्याचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. नागरिकांची आर्थिक लूट करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी टिक टॉक प्रो नावाचे नवीन अॅप उपलब्ध असल्याचे मेसेज पसरवले आहेत.
एका विशेष मालवेअरद्वारे टिक टॉक प्रो नावाची लिंक सध्या भारतातील मोबाईल धारकांना पाठवली जात आहे. भारतात टिक टॉकवर जरी बंदी असली तरी टिक टॉक प्रो या नव्या व्हर्जनचा तुम्ही वापरू शकता, अशा प्रकारचे व्हॉट्सअॅप मेसेज व एसएमएस हे देशभरातील नागरिकांना एका लिंकच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची लूट करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत आहेत.
लिंकवर क्लिक करू नका -
व्हॉट्स अॅप किंवा एसएमएसच्या माध्यमातून आलेल्या लिंकवर जर क्लिक केले तर एक मालवेअर आपोआप मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकात जाऊन बसते. हे मालवेअर मोबाईल, लॅपटॉप व संगणकातील बँकिंग संबंधी असलेली पूर्ण माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचवते. या मालवेअरमुळे ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार हे सायबर गुन्हेगारांच्या नियंत्रणात येऊन खात्यातून नकळत सर्व रक्कम गायब होते.
लिंक आल्यास काय करायला हवे -
टिक टॉक संदर्भात एखादा मेल, व्हॉट्स अॅप मेसेज किंवा एसएमएस येत असतील तर ते तत्काळ डिलीट करा. कुठल्याही परिथितीत अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नका. मोबाईलमध्ये, लॅपटॉप व संगणकात अँटी मालवेअर, अँटी व्हायरस असल्याची खात्री करून घ्या.