मुंबई Cyber Crime In Mumbai : आयबीच्या निवृत्त अधिकाऱ्याची सायबर भामट्यांनी लाखोंची फसवणूक केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वीजबिल भरण्याच्या नावाखाली या आयबी ( Intelligence Bureau Officer ) अधिकाऱ्यांची 7 लाखांनं फसवणूक करण्यात आली आहे. रघुनाथ केशव करंबेळकर असं सायबर भामट्यांनी चुना लावलेल्या आयबी अधिकाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी मुलुंड इथल्या नवघर पोलीस ठाण्यात रविवारी ( १२ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामट्यांनी केला वीज कट होण्याचा मेसेज : इंटेलिजन्स ब्युरो (IB) मधून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ करंबेळकर ( वय ) हे 2001 पासून पत्नी आणि मुलांसह नवघर परिसरात राहत आहेत. ते सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहेत. रघुनाथ करंबेळकर यांनी नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आला होता "प्रिय ग्राहक तुमची वीज आज रात्री 9:45 वाजेपर्यंत खंडित केली जाईल. गेल्या महिन्यात तुमचं बिल अपडेट झालेलं नाही, लगेच तुमचे अधिकारी देवेश जोशी यांच्याशी संपर्क साधा" असा मेसेज त्यांच्या नंबरवर आला होता.
व्हॉट्सअॅप पाठवली लिंक : रघुनाथ करंबेळकर यांनी सायंकाळी 5:45 वाजता मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर देवेश जोशी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आपलं वीज बिल भरलं असल्याचं सांगितलं. तेव्हा देवेश जोशी नावाच्या व्यक्तीनं महावितरणच्या वेबसाईटवरुन वीजबिल भरल्याचं उत्तर दिलं. परंतु बिल भरलं नाही. तुम्ही पेमेंट केलं आहे ते दिसत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्तीनं रघुनाथ करंबेळकर यांच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्स अॅप लिंक पाठवली आणि ती ओपन करण्यास सांगितलं. रघुनाथ यांनी प्रयत्न केला पण लिंक ओपन झाली नाही. त्यानंतर त्या व्यक्तीनं तीच रघुनाथ यांची पत्नी मनीषा यांच्या मोबाईलवर लिंक पाठवली.
पाच रुपये भरण्यास घेतली डेबिट कार्डची माहिती : फसवणूक करणाऱ्या भामट्यानं रघुनाथ करंबेळकर आणि त्यांची पत्नी मनीषा यांना प्रथम त्यांचा ग्राहक क्रमांक लिहून 5 रुपये ऑनलाइन जमा करण्यास सांगितलं. फसवणूक करणाऱ्या भामट्यानं मनीषा यांच्याकडून डेबिट कार्ड क्रमांक मिळवला. पीडित महिलेचं वीज कनेक्शन खंडित करू नये, या तणावात त्यांनी फसवणूक करणाऱ्याला डेबिट कार्डवर लिहिलेलं सर्व काही सांगितलं. थोड्याच वेळात मनीषा यांच्या मोबाईलवर त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख आणि 2 लाख रुपयांच्या दोन मुदत ठेवी काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर 34 हजार रुपयांच्या रकमेची मुदत पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढल्यानं मुदत ठेव बंद झाली आहे. ऑनलाईन खरेदीचा मेसेजही आला. एकूण 7 लाख 34 हजार रुपये बँक खात्यातून वजा करण्यात आले. पोलिसांच्या सायबर सेलने त्या सायबर चोरांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा :