मुंबई Cyber Crime in Maharashtra : कोणत्याही सामान्य व्यक्तीचे किंवा संस्थेचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होणं, ही आजकाल सर्व सामान्य गोष्ट झालीय. मात्र, आता हॅकरनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील सोडलेलं नाहीय. वादग्रस्त एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि नुकतेच जामिनावर सुटलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं ताजं प्रकरण समोर आलंय. या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं अंबानींच्या घराबाहेर बॉम्बस्फोटाचा कट आणि मनसुखच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केलाय. त्याचं फेसबुक अकाऊंटदेखील हॅक झाल्याचं त्यांना (Fraud of money) कळलं.
बनावट आयडी बनवून पैसे मागितले : प्रदीप शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये त्यांचा फेसबुक आयडीचा बनावट आयडी बनवून पैसे मागितले जात असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. कृपया कोणत्याही पैशाचा व्यवहार करू नका, असं त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील नागरिकांना आवाहन केलं होतं. कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात आल्याचा प्रदीप शर्मा यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे.
हॅकरने अनेकांना मेसेज केला : 27 ऑगस्ट रोजी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणून पोस्ट केलेले श्रीकांत पाठक यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आलंय. समोरच्या हॅकरने अनेकांना मेसेज केला होता की, माझा सीआरपीएफमध्ये एक मित्र असून त्याची बदली झाली आहे. त्याच्या घरून फर्निचर आणि इतर वस्तू स्वस्त दरात विकत आहेत. आपण इच्छित असल्यास पैसे पाठवून घेऊ शकता. श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, सायबर ठगांनी त्याचा फोटो वापरून एक फेसबुक पेज तयार केलंय. माझ्या मित्रांना फर्निचर विकण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केलीय. पाठक पुढे म्हणाले की, लोकांनी त्यांचं खातं खासगी ठेवावं, ते पब्लिक ठेवल्याने हॅक होण्याची शक्यता (cyber crime) वाढते.
सायबर चोरट्यांना बळी न पडण्याचं आवाहन : 6 मे रोजी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहिलं होतं की, नमस्कार मित्रांनो काही भामट्यांनी माझ्या नावाने बनावट खातं तयार केलंय. माझ्या संपर्कांना सतत मेसेज पाठवत आहेत, मी कठोर कारवाई करणार आहे. परंतु तुम्ही सर्वानी कोणतेही रिप्लाय देऊ नका. कोणतीही माहिती शेअर करू नका. ते फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. विश्वास नांगरे पाटील हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, जे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त डीजी म्हणून नियुक्त आहेत. राज्याच्या महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र सिंघल यांचं देखील फेसबुक अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झालं होतं. त्यानंतर त्यांनी देखील फेसबुकवरती पोस्ट टाकून सायबर चोरट्यांना बळी न पडण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. यासंदर्भात अधिक माहिती देताना सिंगल यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की, माझे फेसबुक अकाउंट तीन दिवसांपूर्वी हॅक करण्यात आलं होतं. सायबर पोलिसांना याबाबत माहिती देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, ई-मेल करून देखील बनावट फेसबुक आयडी बंद करता येत असल्याची माहिती सिंघल यांनी दिलीय.
सायबर एक्सपर्टची प्रतिक्रिया : सायबर एक्सपर्ट वकील प्रशांत माळी यांनी सांगितलंय की, जेव्हा कोणी त्याचा फोटो वापरून फेसबुक पेज तयार करतो. त्यावेळी तुम्ही ताबडतोब फेसबुकच्या लोकांना एक अलर्ट मेसेज पोस्ट करा, रिपोर्ट करा आणि फेसबुकला याची तक्रार करा. तुमच्या मित्रांनाही तक्रार करण्यास सांगा, जेणेकरून फेसबुक स्वतः नवीन बनावट खात्यावर कारवाई करेल.
हेही वाचा :