मुंबई- लॉकडाऊनचा फायदा घेत झोपडपट्टी माफियांनी आरे कॉलनीत हैदोस घातला आहे. आतापर्यंत आरेतील मोठ मोठी 70 ते 75 झाडे कापत त्या जागेवर झोपड्या वसवल्या आहेत. मात्र, याकडे कानाडोळा केला जात असल्याचे म्हणत पर्यावरणप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाच याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
गेल्या आठवड्यात आरेतील युनिट 13 मध्ये झोपडपट्टी माफियांकडून झाडे कापली जात असल्याचे समजल्याबरोबर स्थानिकांनी तेथे धाव घेत हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. पण हे माफिया स्थानिकांवरच अरेरावी करत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हा वनशक्ती या संस्थेने याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर अद्याप सुनावणी होणे बाकी आहे.
याचिका दाखल झाल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळेच आजच्या घडीलाही आरेतील न्यूझीलंड हॉस्टेल येथे झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. येथे 35 ते 40 झाडे कापण्यात आली आहेत. यात निलगिरीच्या झाडांचाही समावेश असल्याची माहिती याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, पण त्यावर सुनावणी होईपर्यंत शेकडो झाडे कापली जातील. त्यामुळे, आता आम्ही आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपील करत हा प्रकार थांबवावा आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी मागणी करत आहोत. ते यावर लक्ष देतील अशी आशा आहे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे.