मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पूल पाडून मलबा हटवण्याचे काम अखेर शनिवारी पूर्ण झाले आहे. त्यानुसार आजपासून रस्ता बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढच्या 15 दिवसात हे काम पूर्ण करत याठिकाणी दोन नव्या मार्गिका वाहतूकीसाठी 1 मे पासून सुरू करण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
190 वर्षे जुना-मोडकळीस आलेला अमृतांजन पूल लॉकडाऊनच्या काळात पडण्यासाठी घेण्यात आला. 4 एप्रिलला नियंत्रित स्फोटकाचा वापर करत काही मिनिटांत पूल उध्वस्त करण्यात आला. त्यानंतर मलबा हटवत पुलाचा भाग मोकळा करण्यात आला आहे. साधारणतः 950 ट्रक मलबा 12 डंपरच्या सहाय्याने हटवण्यात आला. हे काम शनिवारी पूर्ण झाले. पुलाचे खांब खूप मोठे होते. त्यामुळे आता दोन्ही बाजूला एक-एक मार्गिकेची जागा उपलब्ध झाली आहे. आता या जागेवर रस्ता अर्थात मार्गिका बांधण्यास सुरुवात झाली आहे. हे काम 15 दिवसात अर्थात लॉकडाऊन संपण्याच्या आत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. त्यामुळेच कामाला वेग देण्यात आला असून 1 मे ला दोन नव्या मार्गिका सेवेत दाखल होतील. त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या सुटेल असा दावा गायकवाड यांनी केला आहे.