मुंबई- कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या बीकेसी कोविड सेंटरला अधिकाधिक अद्ययावत, अत्याधुनिक सुविधायुक्त करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) भर आहे. त्यातूनच आता या सेंटरमध्ये देशातील पहिले 'सी.टी इनबॉक्स' मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनद्वारे रुग्णांच्या फुफ्फुसातील संसर्गाचे निदान केवळ १६ सेकंदात करणे शक्य होणार आहे. ही मशीन आता मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
या मशिनीमुळे कोरोना रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यास आता मदत होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त आर.ए राजीव यांनी दिली. एमएमआरडीएने बीकेसीत दोन टप्प्यात कोविड सेंटर उभारत ते पालिकेकडे व्यवस्थापनासाठी हस्तांतरित केले आहे. या सेंटरमध्ये आजपर्यंत शेकडो रुग्ण बरे होऊन गेले असून हे सेंटर सुविधा आणि उपचारासाठी पहिल्या क्रमांकाचे मानले जाते. त्यात आता या सेंटरमध्ये आणखी एक अत्याधुनिक निदान पद्धती सुरू करण्यात आली आहे. ती म्हणजे सी टी इनबॉक्स.
सी.टी इनबॉक्स मशीनद्वारे फुफ्फुसातील संसर्गाचे निदान केवळ १६ सेकंदात करता येते. तर, योग्य निदान केवळ काही सेकेंदातच होते, पण त्याचबरोबर पुढेही उपचारानंतर फुफ्फुसातील संसर्ग किती कमी झाला आहे, किंवा वाढतच चालला आहे हे समजण्यासही मदत होते. त्यामुळे, ही मशीन कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. परदेशात वापरली जाणारी ही मशीन आता भारतात एमएमआरडीएच्या माध्यमातून बसवण्यात आली आहे.
एल अँड टी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स आणि आणखी एका कंपनीच्या सहकार्याने ही सुविधा एमएमआरडीएने उपलब्ध करून दिली आहे. १६ सेकेंदात फुफ्फुसातील संसर्गाचे निदान याद्वारे होतेच. पण ही मशीन वापरणे रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही सुरक्षित आहे. कारण ही मशीन वापरताना रुग्ण आणि कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत. तर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे रेडिएशनपासूनही संरक्षण करणारे तंत्रज्ञान यात आहे.
हेही वाचा- राज्यात ८ हजार १४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २१३ रुग्णांचा मृत्यू