मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील सर्वाधिक स्वच्छ स्थानकाचा मान मिळाला आहे. जल शक्ती, पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयद्वारे हे घोषित करण्यात आले आहे. गॉथिक शैलीतील बांधकाम असलेले हे स्थानक मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील १०० स्वच्छ ठिकाणांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील ३० ठिकाणांना तीन टप्प्यात विभाजित करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १० ठिकाणे घोषित केली होती. यामध्ये वैष्णो देवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज महल, तिरूपती मंदिर, स्वर्ण मंदिर, मणिकर्णिका घाट, अजमेर शरीफ दर्गा, मीनाक्षी मंदिर, कामाख्य मंदिर, जगन्नाथ पुरी या ठिकाणांचा समावेश होता.
दुसऱ्या टप्प्यात यमुनोत्री, महाकालेश्वर मंदिर, चारमीनार, सेंट फ्रांसिस ऑफ असीसी चर्च अॅन्ड कॉन्वेंट, कलदी, गोम्मटेश्वर, बैद्यनाथ धाम, गया तीर्थ आणि सोमनाथ मंदिर हे होते. तिसऱ्या टप्प्यात राघवेंद्र स्वामी मंदिर, हजारीवारी पॅलेस, ब्रह्मा सरोवर मंदिर, विदुरकुट्टी, माणा गाव, पैंगोग झील, नागवासुकी मंदिर, इमा कैथल, सबरीमाला मंदिर आणि कण्वाश्रम या ठिकाणांचा समावेश आहे.
५ सप्टेंबरला दिल्ली येथील विज्ञान भवनात 'स्वच्छ महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सीएसएमटीला देशातील सर्वश्रेष्ठ स्वच्छ आइकॉनिक ठिकाण म्हणून घोषित केले जाणार आहे.