मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात पालिकेच्या सीएसटी येथील 'ए' विभागाच्या हलगर्जीपणामुळे पूल कोसळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालानंतर 'ए' विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेत केली जात होती. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली दादर येथील जी उत्तर विभागात केली आहे.
किरण दिघावकर यांच्यासह पाच विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. दोन अभियंत्याकडे सहाय्यक विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असून ६ जून ला बदलीचे अद्यादेश काढले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी आजपासूनच बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश महापालिका सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
महापालिकेच्या रुग्णालय विभागाच्या सहाय्यक आयुक्त (रुग्णालये) अलका ससाणे यांची बदली भायखळाच्या ई विभागात सहाय्यक आयुक्त पदी केली, तर ई विभागाचे अतिरिक्त भार असलेले प्रभारी सहाय्यक नितीन रमेश आर्ते यांची सीएसटी येथील ए विभाग कार्यालयाचे किरण दिघावकर यांच्या जागी बदली केली. किरण दिघावकर यांना जी उत्तरची जबाबदारी सोपवली आहे. दादर जी उत्तर विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांची सांताक्रूझ एच पूर्व विभागात तर एच पूर्व विभागाचे गजानन बेल्लाळ यांची सायन वडाळा येथील एफ उत्तर विभागात बदली केली. एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्यावर मालमत्ता विभागाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामध्ये अशोक खैरनार व गजानन बेल्लाळ कार्यकारी अभियंत्यांची पूर्णकालिन कार्यभार भत्तावर नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांना सहाय्यक आयुक्त या पदाचा पगार न देता कार्यकारी अभियंता या पदाचाच पगार दिला जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने बदलीच्या आदेशात म्हटले आहे.