मुंबई - सीएसटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारती शेजारी असलेला पूल शुक्रवारी कोसळला. त्यानंतर येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. पुलाचा धोकादायक भाग पाडल्यानंतर आज (शुक्रवारी) या पुलाची पाहणी केली जाणार आहे. यामुळे आजही सीएसटी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
सीएसटी स्थानकातील मशीद बंदर बाजूला टाइम्स ऑफ इंडिया, जिटी रुग्णालय, पोलीस कार्यालय, किल्ला कोर्ट, महापालिका मुख्यालय, मेट्रो आदी ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात हजारो प्रवासी या पुलाचा वापर करतात. गुरुवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी हा पूल कोसळला. या दुर्घटनेत६ जणांचा मृत्यू झाला.
पुलाचा काही भाग कोसळल्यावर महापालिकेने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. तसे कामही सुरू करण्यात आले. पहाटे पर्यंत धोकादायक असलेला भाग पाडून डेब्रिज व लोखंड हटवण्यात आले. रस्ता साफ करण्यात आला. मात्र, पुलाचा सांगाडा तसाच ठेवण्यात आला. या सांगाड्याची पाहणी सकाळी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
पुलाच्या सांगाड्याची पाहणी करून उर्वरित भाग पाडला जाणार आहे. तो पर्यंत पुलाचा सांगाडा तसाच राहणार आहे. पुलाचा सांगाडा पाडायचा असल्याने वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे सीएसटी स्थानक ते क्रॉफर्ड मार्केट आणि जे.जे फ्लाय ओव्हरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.