मुंबई - मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यातच आज रविवारचा दिवस असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे.
मुंबई आणि कोकण परिसरात काही भागात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज रविवार असल्यामुळे वाहतूक कमी आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी चौपाटीवर गर्दी केली आहे.
शुक्रवारपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहेत. दोन दिवस मुंबईच्या विविध भागात पडलेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी गाठली आहे. शनिवारी दिवसभरात मालाड परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
पहिल्याच पावसात मुंबईची गती मंदावली होती. संततधार पावसामुळे काही ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. तर २४ तासांत मुंबईत ३७ विविध ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.