मुंबई India Alliance : राष्ट्रीय पातळीवर भाजपाला रोखण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापन केली आहे. बुधवारी (6 डिसेंबर) रोजी होणारी इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली आहे. त्यामुळं इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावरून शिंदे गटानं इंडिया आघाडीच्या अपयशावर जोरदार टीका केली आहे. चार राज्यांत झालेल्या पराभवामुळं इंडिया आघाडी शिल्लक राहिली नसल्याचं शिंदे गटानं म्हटलंय. इंडिया आघाडीत बिघाडी झाली असून तेलंही गेलं तुपही गेलं, अशी अवस्था इंडिया आघाडीची झाल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते प्रा. अरुण सावंत यांनी म्हटलंय.
या राज्याच्या हितासाठी महायुती काम करत आहे. त्यात अडथळे आणू नका. नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही. महायुती जनतेच्या विकासासाठी काम करत आहे. राज्यात विकासकामं आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळं महाविकास आघाडीनं माकडचेष्टा करणं तत्काळ थांबवावं. - प्रा. अरुण सावंत, प्रवक्ते (शिंदे गट)
माकडचेष्टा करुन सत्तेवर येता येणार नाही : पुढं बोलताना सावंत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी माकडचेष्टा सुरू केलेल्या आहेत. कार्टून चित्र बनविणं, कोण-कोणाला म्हणालं, असं बॅनर लावणं, खोटे आरोप करणं, या माकडचेष्टा महाविकास आघाडीनं तात्काळ थांबवाव्यात. अन्यथा जनतेमध्ये तुमची काहीच किंमत उरणार नाही. तुम्हाला जनता फेकून देईल. महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं पुढे नेणाऱ्या महायुतीला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विरोधकांनी साथ द्यावी, विकासाच्या काही सूचना असतील तर त्या कराव्यात, असं सावंत म्हणाले.
अन्यथा तुम्हांला जनता फेकून देईल : राज्याच्या हिताचं काही करायचं असेल, तर महाआघाडीच्या कामात अडथळे आणू नका, अन्यथा जनता तुम्हाला हाकलून देईल. महायुती लोकांच्या विकासासाठी काम करत आहे. विकासकामं आम्ही पुढं नेत आहोत. लोकांना तुमच्या विनोदात रस नाही, असं शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते प्रा.अरुण सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -