मुंबई - देशात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते. मात्र, याच मुंबईत मागील काही वर्षांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार दरोड्याचा प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने तब्बल ९४९ कोटी रुपये खर्च करून ६ हजार कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण कमी झालेली नाही.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालेल्या आरटीआयच्या माहितीनुसार मुंबईत जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ४ हजार ६७४ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकूण ४५ कोटी ६९ लाख ५० हजार ५८२ रुपये इतकी किंमतीची मालमत्ता जबरी चोरी झाली आहे. यामध्ये पोलिसांनी फक्त १६ कोटी ७५ लाख ४६ हजार २९५ रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केल्याने आतापर्यंत केवळ ३७ टक्के मालमत्ता किंवा रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.