मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी तर, रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून नवीन नियमावली लागू झाली आहे. मॉल्स, थिएटर, स्विमिंग पूल, जिम पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वस्तू, मेडिकल्स, याबरोबरच भाजी मंडई व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असतील.
पोलीस आयुक्तांनी दिल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना सूचना -
याबरोबरच मुंबईतील सर्व धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात आली आहेत. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता इतर कुणालाही बाहेर येण्यास परवानगी नाही. अशा व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, असे पोलीस आयुक्तांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी -
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
हेही वाचा - राज्यात सोमवारी 47 हजार 288 कोरोनाबाधितांची वाढ; 155 मृत्यू