मुंबई- मुंबईत लस कधी येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. आज (बुधवार) पहाटे मुंबईत १ लाख ३९ हजार लसीचे डोस आले असून, हा साठा पहिल्या टप्प्यासाठी पुरेसा असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर आता हा साठा पालिकेच्या परळ येथील कार्यालयात ठेवण्यात आला असून याचे वाटप १६ जानेवारीला सकाळी करण्यात येणार आहे.
९ केंद्रावर होणार लसीकरण
पहिल्या टप्प्यासाठी मुंबईत ९ लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. कुपर, नायर, केईएम, सायन, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, ट्रॉमा केअर आणि बीकेसी कोविड सेंटर या भागांमध्ये हे केंद्र उभे करण्यात आले आहे. यात ७२ युनिट असून सर्वाधिक १५ युनिट हे बीकेसी कोविड सेंटर येथे आहेत. दरम्यान पुढच्या टप्प्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यानुसार पुढे ९ वरून लसीकरण केंद्राचा आकडा ५० वर नेण्यात येणार आहे. यात उर्वरित कोविड सेंटरसह पालिकेचे दवाखाने, डिस्पेनसरी आणि गरज पडल्यास शाळा-जिमखाने येथेही केंद्र निर्माण केली जाणार आहेत.
बीकेसीमध्ये सर्वात जास्त लसीकरण?
ज्या ७२ युनिटसमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण होणार आहे, त्यातील सर्वाधिक १५ युनिट हे एकट्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधीक लसीकरण हे येथेच होण्याची शक्यता आहे. दिवसाला किमान अडीच हजार जणांचे लसीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दरम्यान १० हजार लसीचे डोस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांनी सांगितले.
कोरोनाविरोधातील लढाईतील सोनियाचा दिन-
आता आम्हाला केवळ लस उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. १६ जानेवारीच्या सकाळी सर्व केंद्रांना लस वितरित केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होईल आणि हा दिवस कोरोनाविरोधातील लढाईतील सोनियाचा दिन ठरेल असा विश्वास पालिकेकडून व्यक्त केला जात आहे.