मुंबई - कोरोनाच्या संक्रमण प्रमाण वाढत असताना मुंबईत पॉझिटिव्ह रुग्ण टॅक्सी, रेल्वेतून कोविड सेंटर गाठत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनेही टॅक्सीतून प्रवास केल्याची माहिती 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली.
मुंबईत प्रतिदिन सुमारे नऊ हजार नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडत आहे. वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. रुग्णालय, दवाखाने, जंबो कोविड सेंटरही रुग्णांनी फुल्ल झाल्याची स्थिती आहे. राज्य सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. पण, लोकांकडून म्हणावे तसे नियमांचे पालन केले जात नाहीत. काहीजण माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालिका प्रशासनासमोरील अडचणी वाढत आहेत. त्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असेलेले रुग्णही टॅक्सी, रेल्वे आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करत आहेत. परिणामी समूह संसर्गाचा धोका बळावत आहे.
डॉकयार्ड रोड येथे इमारतीचे बांधकाम करणाऱ्या एका तरुणाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ठेकेदाराने रुग्णवाहिकेऐवजी टॅक्सीने त्याला भायखळा येथील जंबो कोविड सेंटरमध्ये आणल्याचे त्यांने सांगितले. तर एक महिला, पुरुष आणि दहा वर्षीय मुलगी, अशा तिघांनी डोंबिवली येथून रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत भायखळ्याचे कोविड सेंटर गाठले. महामुंबईतील विविध भागातून अनेक पॉझिटिव्ह रुग्ण अशाच प्रकारचा जीवघेणा प्रवास करत आहेत.
एकीकडे कोरोनाची साखळी थांबवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जाते. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्यामुळे कोरोना रुग्णांची साखळी रोखण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कोरोनाची चाचणी रोखण्यासाठी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
हेही वाचा - रूग्णवाहिका चालकांकडून होतेय नागरिकांची लूट?
हेही वाचा - केंद्र सरकारचा महाराष्ट्राबरोबर दुजाभाव; नवाब मालिकांचा पुराव्यानिशी आरोप