मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आहे. पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बूस्टर डोस देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेकडून रुग्णालयांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्ड मधील काही ठराविक लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. पालिकेकडून देण्यात येणारा हा डोस इंट्रानेसल म्हणजेच नाकावटे दिला जाणारा असून, केवळ ज्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसची आवश्यकता अशांनाच तो देण्यात येईल. अशी सूचना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत बूस्टर डोस घ्यायचा असल्यास पालिकेने ज्या लसीकरण केंद्रांची यादी जाहीर केली आहे तिथेच घ्यावा लागणार आहे.
यादी महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध- पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस iNCOVACC असून याची निर्मिती भारत बायोटेक या कंपनीने केली आहे. ही लस इंट्रानेसल असून ती नाकावाटे घ्यावी लागते. पालिकेच्या 24 वॉर्ड मध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असणार आहे. या रुग्णालयांची यादी पालिकेने सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध केली असून, ही यादी तुम्हाला पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर व पालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाहता येईल.
लशीसाठी नोंदणीची गरज नाही-तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास त्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्व नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर जाऊनच तुम्हाला नोंदणी करावी लागेल. या लसीकरणाचा वेळ देखील सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. नाका वाटे दिली जाणारी लस सुई विरहित असून या लसीची एक कुपी दोन जणांना दिली जाणार आहे. हे मोफत डोस केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याने तुमच्या घरात कोणी जेष्ठ नागरिक असल्यास त्यांना याबाबत माहिती द्या, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानासल कोविड लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली आहे.