मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. राज्यात कमी होणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यसरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निर्बंध शिथिल केल्यानंतरही नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आरोग्याबाबत काळजी सामान्य नागरिकांनी घेतली पाहिजे. ध्याच्या वातावरणात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आमदार संजय पोतनीस, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.
अर्थचक्र सुरळीत व्हावे यासाठी निर्बंध शिथिल
राज्याचे अर्थचक्र सुरळीत व्हावे यासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत हे आपल्याला विसरुन चालणार नाही. नागरिकांनी कोणाच्याही चिथावणी किंवा आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करू नका, असे आवाहन करून मुख्यमंत्री यांनी केले. कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.
निदान कोविडदूत बना
पहिल्या लाटेच्या शेवटीही सण-उत्सव आले होते. आताही दुसरी लाट ओसरत आली आहे. यातच सण-उत्सवांची सुरुवात होत आहे. राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ही मोकळीक पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत, अर्थचक्र थांबू नये यासाठी निर्णय घेण्यात आला. संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविडयोद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्सची स्थापना करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य
शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. असे टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील, असेही ते म्हणाले.
असे आहे लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र
कलिना विद्यापीठ आय.टी.पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूटांचे असून रुग्ण खाटांची संख्या 30 आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचारासाठी तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात 24 तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या केंद्रात लहान मुलांना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे, असा प्रयत्न करण्यात आला आहे. रंगीबेरंगी भिंती, विविध खेळणी, कार्डबोर्डचे बेड्स, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) 4 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 105 मृत्यूंची नोंद झाली असून 6 हजार 384 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97 टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा - पत्नीने केली पतीची हत्या, मृतदेह पुरला घरात; मुंबईतील क्रांतिनगर परिसरातील घटना